Friday, 30 January 2015

मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांना आरक्षण लागू करावे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची मागणी.

प्रसिद्धीसाठी

दिनांक २९-१-२०१५

 

मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांना आरक्षण लागू करावे

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची मागणी.

 

मुंबई दि.२९.प्रतिनिधी- मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा आरक्षण लागू करावे, अशी मागणी आज विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजातील मागासलेल्या विविध घटकांना आरक्षण देण्याबाबत दि.९ जुलै २०१४ रोजी शासनाने अध्यादेश काढला होता.या अध्यादेशाच्या विरोधात काही लोक उच्च न्यायालयात गेले होते.माननीय उच्च न्यायालयाने याबाबत अंतरिम निकाल देताना मुस्लिम समाजातील मागासलेल्या विविध घटकांना फक्त शिक्षण क्षेत्रापुरतेच आरक्षण देण्यासाठी मान्यता दिलेली आहे.या अध्यादेशाच्या कालावधीस सहा महिने उलटुन गेल्याने अध्यादेशाची मुदत संपली अाहे त्यामुळे सदर आरक्षणाचा लाभ मुस्लिम समाजास मिळत नाही. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांना  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याने मुस्लिम समाजाच्या न्याय मागणीसाठी आदेश देण्यात यावे असे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

यावेळी शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अब्दूल सत्तार, अमित देशमुख, नसीम खान आदी कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment